इतरही शिवभोजन थाळी केंद्रानी चव्हाण यांचे अनुकरण करण्याचे शिवसेनेचं आवाहन
नगर, (दि.१३) : कोरोना कर्फ्यूच्या काळात रोजगार नसलेल्या उपाशी लोकांना मोफत शिव भोजन थाळीची सेवा देणाऱ्या चव्हाण बंधू यांनी या संकटाच्या काळातही माणुसकी व समाजसेवेचा भाव जपला आहे. अशी शाबासकी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी दिली आहे. नगर शहरात इतरही शिवभोजन थाळी केंद्रांनी चव्हाण यांचा आदर्श घेऊन त्यांचे अनुकरण करावे व कोरोना कर्फ्यू काळात पाच रुपये देखील या गोरबारीबाकडून न घेता त्यांना मोफत जेवण देऊन माणुसकी दाखवावी असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबतचे निवेदन यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी याना पाठवले आहे. तसेच कोरोना काळात नगरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून राहुल द्विवेदी हे उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल राठोड यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीला ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशाकडून नगरमध्ये खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. संपूर्ण राज्यावर कोरोनामुळे लॉक डाऊन करण्याची वेळ आल्यानंतर १० रुपयात मिळणारी शिवभोजन थाळी उद्धव ठाकरे यांनी अवघ्या ५ रुपयात करण्याचे आदेश दिले. तसेच थाळ्यांची संख्या देखील वाढवण्यात आली. कोरोना कर्फ्यूच्या काळात हातावर पोट असलेल्या लोकांची या शिवभोजन थाळीच्या केंद्रापाशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पण बहुतेकांकडे शिवथाळी मिळवण्यासाठी ५ रुपये देखील नाहीत त्यामुळे नगरमधील मार्केट यार्ड शेजारील आवळा चहा शिवभोजन थाळी चालविणाऱ्या चव्हाण बंधूनी मोफत शिवभोजन थाळीचे पार्सल वितरण सुरु केले तसेच कोरोनाचा कहर संपे पर्यंत पार्सलची संख्या देखील वाढवली. जेवणासाठी दारावर आलेल्या एकालाही ते परत पाठवत नाहीत. या ठिकाणी दररोज २५० ते ३०० शिवभोजन थाळी पार्सलचे वितरण केले जाते . त्यांच्या या कार्याचे कौतुक माजी आ.अनिल राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, दिलीप सातपुते व शिवसैनिकांनी केले आहे.