कोरोनाविरोधात लढणार्‍या कर्मचार्‍यांचे पगार द्या : सुधीर भद्रे

नगर (दि.20) : कोरोना सोबत सुरू असलेल्या अदृश्य जैविक महायुद्धातील अत्यावश्यक सेवेतील पोलीस, वैद्यकीय विभाग, महसूल इत्यादी यंत्रणांमधील लढवय्या सैनिकांचे पगार शासनाने तातडीने द्यावेत  अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, चीनमध्ये वुहान शहरात जन्मलेल्या कोरोना ने जगभर मृत्यू तांडव व भितीचे वातावरण पसरवले आहे. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. 22 मार्चच्या जनता कर्फ्यू नंतर 23 मार्च पासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. यासोबतच संचारबंदी, जिल्हाबंदी आदी उपायही अवलंबिण्यात आले आहेत.

देशासह महाराष्ट्रात कोरोनाविरुद्ध लढाई मोठ्या जोमाने अत्यावश्यक सेवेतील सैनिकांच्या जीवावर लढविली जात आहे. या सैनिकांचे म्हणजेच शासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांचे एक दिवसाचे वेतन सुरुवातीलाच कोरोनामुळे सहाय्यता निधी मध्ये वळविण्यात आले आहे .

पोलीस विभागाच्या तर साप्ताहिक सुट्ट्या, रजा बंद करण्यात आल्या आहेत. संचार बंदी, कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत आहे .त्यातच पोलीस विभागाचे मूळ पगारही कमीच आहेत. अशाच प्रकारे सर्वच शासकीय विभागांमध्ये आवश्यक मनुष्यबळाच्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे कार्यरत असणार्‍या अत्यावश्यक सेवेच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांना कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

अधिकार्‍यांचे पगार कोरोनाच्या कालावधीत पुरते दुपटीने द्यावेत अशी मागणी जनसंसदेचे सुधीर भद्रे, जेष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, अशोक सब्बन, युवा आघाडीचे प्रमुख अशोक ढगे, कैलास पठारे, डॉ.प्रशांत शिंदे, भगवान जगताप, वीर बहादुर प्रजापती, बबलू खोसला, परदेशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post