निवासी उपजिल्हाधिकारीपदी संदीप निचित

नगर (दि.18) : जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी संदीप निचित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे मेट्रोच्या उपमहाव्यवस्थापक पदावर निचित कार्यरत होते. काल शुक्रवार रोजी त्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश मंत्रालयातून जारी करण्यात आले. आज शनिवार रोजी संदीप निचित आपला निवासी उप जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

उपजिल्हाधिकारी म्हणून संदीप निचित यांची २००७ मध्ये निवड झाली. त्यावेळी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निचित प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. निवडीनंतर सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. 

नगर जिल्ह्यात संगमनेर प्रांताधिकारी म्हणून कामकाज पाहिल्यानंतर नगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदाची जबाबदारी देखील निचित यांनी सांभाळली. दरम्यान काही काळ प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणूनही निचित यांनी कामकाज पाहिले. फ्रेब्रुवारी २०१९ मध्ये निचित यांची पुणे मेट्रोच्या उप महाव्यवस्थापक पदी नियुक्ती झाली. 

दरम्यान, नगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणारे प्रशांत पाटील यांची गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे खासगी सचिव म्हणून मंत्रालयात नियुक्ती झाली.त्यानंतर रीक्त झालेल्या निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी रोजगार हमी शाखेचे उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मागील चार महिन्यापासून पूर्ण वेळ निवासी उपजिल्हाधिकारी नियुक्तीची प्रतीक्षा होती. दरम्यान काल शुक्रवार रोजी मंत्रालयातून निचित यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश जारी झाले. त्यानुसार आज शनिवारी संदीप निचित निवासी उपजिल्हाधिकारी पदी रूजू होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post