जिल्हा रुग्णालयासह पोलीस व जिल्हा प्रशासनाला होणार वितरण
नगर (दि.04) : कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी मास्क, सॅनीटायझर व निर्जंतुकीकरण साहित्य जीवनावश्यक बनले असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (दिल्ली) पुरस्कृत जन शिक्षण संस्थेच्या वतीने कापडी मास्क बनविण्याचे कार्य प्रगतीपथावर चालू आहे. लॉकडाऊनच्या काळातही या संस्थेत प्रशिक्षण घेणार्या महिला व युवती संस्थेच्या शहरातील पाच केंद्रात मास्क बनवून आपले योगदान देत आहे. संस्थेच्या वतीने तीन ते चार हजार कापडी मास्क बनविण्यात येणार असून, ते जिल्हा रुग्णालय, पोलीस व जिल्हा प्रशासनाला मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांनी दिली.
2005 पासून जन शिक्षण संस्था कार्य करीत आहे. 30 हजार पेक्षा जास्त महिलांनी या संस्थेत व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून महिला, युवती व युवकांना शिवणकामासह विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या वतीने मुख्य कार्यालय दातरंगे मळा, कल्याण रोड शिवाजीनगर, कृष्णानगर, सिध्दार्थनगर, नालेगाव हडको या सेंटरला कापडी मास्क बनविण्याचे काम सध्या सुरु आहे. कविता वाघेला व कमल पवार यांच्या पुढाकाराने हे उपक्रम चालू असून, या उपक्रमासाठी संस्थचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राधेश्याम गुंजाळ, चेअरमन राहुल गुंजाळ, संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, अनिल तांदळे, नंदेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Tags:
Ahmednagar