अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाबत ९ स्त्राव नमुना चाचणी अहवाल निगेटीव


अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाबत ९ स्त्राव नमुना चाचणी अहवाल निगेटीव

नगर  (दि.03) : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या ९ स्त्राव नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटीव आले असून जिल्ह्यात कोरोना बाधित आढळलेल्या दुसर्‍या रुग्णाच्या १४ दिवसानंतर पाठविलेल्या स्त्राव चाचणी अहवालाचाही समावेश आहे. आज पुन्हा या रुग्णाचा दुसरा स्त्राव चाचणी नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असून तो निगेटीव आला तर त्याला घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

दरम्यान, अद्याप एक नमुना चाचणी अहवाल येणे बाकी असून आज शेवगाव येथील आणखी काही व्यक्तींचे स्त्राव नमुने घेऊन ते पुण्याला पाठविण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ४४३ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १७ जणांचे अहवाल पॉझिटिव आले तर ४१९ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात ४८९ जणांची तपासणी करण्यात आली असून १६६ जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण ४२९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या 17 बाधित रुग्णांपैकी १६ रुग्णांना बूथ हॉस्पिटल येथे ठेवण्यात येत असून तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सर्वप्रथम बाधित आढळलेल्या रुग्णाची १४ आणि १५ व्या दिवशी करावयाची चाचणी निगेटीव आल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. घरीच १४  दिवस त्या रुग्णाला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला असून नियमितपणे देखरेख करण्यात येत असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

याशिवाय, बाहेरुन आपल्या जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींनाही होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही नागरिकांना या कोरोना आजाराची लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावे, असे आवाहनही डॉ. मुरंबीकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post