जनगणना कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी


नगर  (दि. 06) : राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी यात सहभागी असणार्‍या सर्व यंत्रणांनी त्यांची जबाबदारी अचूकपणे आणि पुरेशा संवेदनशीलतेने पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.  नागरिकांनीही या जनगणनेसाठी येणार्‍या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जनगणना संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जनगणना कामासाठी नियुक्त केलेले चार्ज अधिकारी आणि त्यांना साह्य करणार्‍या कर्मचारी यांची दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा न्यू आर्टस महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक एस.एन. पायस, आर. ए.चिंधे,  एस.एस. मुळीक, एस.आर. नाईक, उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार वैशाली आव्हाड आदींची यावेळी उपस्थिती होती.

श्रीमती मित्तल यांनी, जनगणना सारख्या महत्वाच्या कार्यक्रमाचे महत्व ओळखून सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

जनगणना संचालनालयाचे उपसंचालक श्री. पायस म्हणाले, ही सोळावी जनगणना आहे. या जनगणनेमध्ये प्रथमच मोबाईल अॅपचा वापर करण्यात येणार आहे. पेपर मोड आणि अॅप्लीकेशन मोड अशा दोन्ही मध्ये माहिती भरण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post