कोरोना रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्या : महापाैर बाबासाहेब वाकळे यांचे आदेश
नगर : कोरोना आजार हा संसर्गजन्य आजार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने १५ दिवस कठोर निर्णय घ्यावेत. शहरातील उद्यानांसह गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी दिले. महापौर वाकळे यांनी डॉ.बोरगे यांच्याकडुन माहिती घेऊन उपाय योजना करण्याच्या सुचना केल्या आहेत.
मनपा हद्दीत व उपनगरांमध्ये कोरोना विषाणूबाबत उपाय योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या पार्श्वभूमीवर महापौर वाकळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या वेळी नूतन आयुक्त श्रीकांत मायकलवार, सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेनाप्पा, उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक महेंद्र गंधे, मनोज कोतकर, अजय चितळे आदी उपस्थित होते.
वाकळे यांनी आरोग्याधिकारी डॉ. बोरगे यांच्यांकडून कोरोनाबाबत माहिती घेतली. शिंकणे, खोकल्यानंतर हवेमार्फत या विषाणूचा प्रसार होतो.
नगर शहर व उपनगरातील नागरिकांनी स्वत: सुरक्षित राहण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांनी वारंवार हात धुवावेत. जरी तुमचे हात खराब झाले नसतील, तरी हॅण्ड वॉश किंवा साबण लावून हात धुवावेत. शिंकणे व कोरडा खोकला आपले तोंड व नाक टिशू पेपर किंवा रूमालाने पुसावेत. कच्चे मांस खाऊ नये, फळे व भाज्या न धुता खाऊ नयेत, असेही सांगण्यात आले आहे..
Tags:
Ahmednagar
