मंबई : एकेकाळी आपल्या अभिनयानं मराठी सिनेसृष्टी गाजवलेले जेष्ठ अभिनेता जयराम कुलकर्णी याचं आज दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व सून असा परिवार आहे. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’ इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या.
जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. काही दिवसांपूर्वीच जयराम यांनी भूमिका साकारलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली.
Tags:
Maharashtra