नगर : ग्रामविकास विभागाच्या यशवंत पंचायत राज अभियान 2018-19 अंतर्गत उत्कृष्ट काम करणार्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती, अधिकारी आणि कर्मचार्यांचा पुरस्कार प्रदान कार्यक्रम मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाला. यात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी संजय गिर्हे यांना गुणवंत कर्मचारी पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, ग्रामविकासचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, कोकण उपायुक्त सुप्रभा अग्रवाल, गिरीष भालेराव, ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी पंचायत राजमधील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचार्यांनी विकासाला चालना देण्यासाठी गावाला स्वयंपूर्ण आणि गावकर्यांना आत्मनिर्भर बनवावे. यातून स्वाभिमान जागृत होण्याबरोबरच गावाचा आणि गावकर्यांचा शाश्वत विकास होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, 73 व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज संस्थांना अधिकार दिले आहेत. याअंतर्गत पंचायतराज संस्थांना अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे अभिप्रेत आहे. राज्यात आतापर्यंत 29 विषयांपैकी 14 विषय जिल्हा परिषदांकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. उर्वरित 15 विषय पंचायत राज संस्थांना निश्चित हस्तांतरित केले जातील. ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या अधिकारांमध्ये वाढ करुन ग्रामविकासच्या चळवळीला गती दिली जाईल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय गिर्हे यांचे अभिनंदन केले. पुढील वर्षापासून राज्य सरकारने ग्रामसेवकांचा स्वतंत्रपणे राज्यस्तरावर सन्मान करावा तसेच या पुरस्कारार्थींना एक वेतन वाढ मिळावी, अशी आग्रही मागणी ढाकणे यांनी केली. या कार्यक्रमावेळी ग्रामसेवक युनियनचे संजीव निकम, रामचंद्र राऊत, गोविंद गांधले, राम कार्ले, युवराज पाटील, रोहिदास भोंदे, भाऊसाहेब राशीनकर, महेश जंगम, शाम पालवे आदींसह ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल ग्रामसेवक संवर्गातून गिर्हे यांचे अभिनंदन होत आहे.
Tags:
Ahmednagar