हमाल पंचायत श्रमिक हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल यांच्यावतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी
नगर (दि.07) : आजची महिला आबला नसून सबला आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करत आहेत. आजच्या स्त्रीया शिकून कर्तुत्ववान झाल्या आहेत, मुक्तपणे सर्वत्र वावरत आहेत, परंतु हे स्वातंत्र्य स्वयंबंधनात राहून स्विकारले पाहिजे. आपणावरील संकटाचा मुकाबला जरुर करा, परंतु त्याचबरोबर मर्यादा पाळून आपली संस्कृती जपली पाहिजे. कुटूंबाची जबाबदारी ही आपल्यावर असल्यामुळे आपले आरोग्य हे चांगले राहिले पाहिजे; त्यासाठी सकस आहार आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. आज महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्य तपासणीचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल, असे प्रतिपादन नगरसेविका शितलताई जगताप यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा हमाल पंचायत श्रमिक हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल यांच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, डॉ.सुप्रिया वीर, डॉ.निलोफर धानोरकर, संगीता भोसले, माजी नगरसेविका निता घुले, डॉ.प्राजक्ता पारधे, डॉ.प्रशांत जाधव, डॉ.महेश वीर, डॉ.अकिल धानोरकर, हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, लक्ष्मीबाई कानडे, प्रा.सिताराम काकडे, डॉ.विजय कवळे, डॉ.अमित कुलांगे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.सुप्रिया वीर म्हणाल्या, आज अनेक स्त्रीया आपल्या दैनंदिन कामकाजात आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. छोट-मोठे दुखणे अंगावरच काढत असतात. परंतु हेच दुखणे भविष्यात गंभीर स्वरुप धारण करत असते. त्यामुळे स्त्रीयांनी आपल्या आहार, विहार आणि आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. त्याचप्रमाणे नियमित आरोग्य तपासणीही केली पाहिजे. वाढत्या वयानुसार वेगवेगळे आजारांची लक्षणे दिसू लागत असतात, तेव्हा यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. मोफत शिबीराच्या माध्यमातून होणार्या तपासणीतून आपल्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे,हीच नियमितता ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्तविकात अविनाश घुले म्हणाले, हमाल पंचायतच्यावतीने हमाल-मापाडी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवित असतो. त्याचा चांगला लाभ त्यांना होत असतो. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांच्या विविध आजारांचे निदान होऊन त्यावर उपचार करणे सोपे जाणार आहे. असे सांगून तपासणी करणार्या डॉक्टरांचे आभार मानले.
यावेळी डॉ.प्रशांत जाधव, डॉ.निलोफर धानोरकर, डॉ.प्राजक्त पारधे, रेश्माताई आठरे, प्रा.सिताराम काकडे आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार माजी नगरसेविका निता घुले यांनी मानले. कार्यक्रमास विजय नालकर, गणेश दवणे, अरविंद डिक्कर, माजी शिक्षणाधिकारी मनोहर वीर, गौतम आढाव, राज गांधी, दिशा रोकडे, हिना सय्यद, भुवनेश्वर यादव, हमाल पंचायतचे उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण आदिंनी शिबीरासाठी परिश्रम घेतले.
Tags:
Ahmednagar