राज्यातील माजी सैनिकांची घरपट्टी, पाणीपट्टी होणार माफ
नगर- राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात राहणार्या माजी सैनिक तसेच सैनिकांच्या विधवा पत्नींची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.13) विधानसभेत केली आहे. या निर्णयाचे माजी सैनिकांच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात येत आहे.राज्यात सुमारे 2 लाख 44 हजार माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा पत्नी राहतात. माजी सैनिकांनी देशाचे रक्षण करण्याचे मोठे काम केलेले आहे. त्यांच्या देशसेवेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या देशसेवेचा गौरव होण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणारे शासकीय कर माफ करावेत, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. ही मागणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मान्य करत माजी सैनिकांच्या मालमत्ता कराची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतल्याने माजी सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याची प्रतिक्रिया अहमदनगर जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मनसुख वाबळे यांनी दिली. या निर्णयाचा नगर जिल्ह्यातील सुमारे 7 हजार माजी सैनिकांना लाभ होणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी रविवारी (दि.15) सकाळी 11 वाजता कोहिनूर मंगल कार्यालय येथील संघटनेच्या कार्यालया समोर माजी सैनिकांच्यावतीने आनंदोत्सव साजरा केला जाणार असल्याचेही वाबळे यांनी सांगितले.
Tags:
Ahmednagar
