महाराष्ट्रातील राज्यसभेचे सात उमेदवार बिनविरोध


 मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतर्फे चार उमेदवार, तर भाजपने तीन जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. विधानसभेच्या संख्याबळानुसार आघाडीचे चार, तर भाजपचे तीन जण निवडून येऊ शकतात. निवडणूक रिंगणात सातच उमेदवार असल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात येईल.

भाजपचे तिसरे उमेदवार डॉ. भागवत कराड यांनी, काँग्रेसकडून राजीव सातव, तर शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. महाविकास आघाडीत चौथ्या जागेवर काँग्रेसने आपला दावा केला होता. मात्र काँग्रेसवर मुत्सद्दीपणाने मात करून शरद पवारांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. काँग्रेसला चौथी जागा न मिळता ती जागा राष्ट्रवादीनेच आपल्या पदरात पाडून घेतली. राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला.

भाजपकडून उदयनराजे भोसले, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले; राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, फौजिया खान; शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रसचे राजीव सातव हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असले तरी खरी सूत्रे ही शरद पवारांच्या हातात आहे अशी टीका केली जाते. पवारांसहीत महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी ही टीका फेटाळून लावली आहे.

मात्र सूत्र पवारांच्या हातात नसली तरी पवारांच्या शब्दाला सर्वाधिक वजन असल्याचे प्रत्येक वेळी दिसून आले. राष्ट्रवादीचे ५४ आमदार असल्याने त्यांच्याकडे मतांची टक्केवारी जास्त होती. त्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसचा दबाव झुगारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post