करीम हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड अजहर शेख यास अटक
नगर : शहरातील उद्योजक करीम हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मुख्य मास्टरमांईड फरार सराईत गुन्हेगार अझहर मंजूर शेख याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशामधून शिवनी येथून मुसक्या आवळल्या आहेत.
उद्योजक करीम हुंडेकरी यांचे खंडणीकरिता अपहरण करणार्या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिवनी (मध्य प्रदेश) येथून शिताफिने पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.13) केली.
शहरातील उद्योजक करीम हुंडेकरी यांचे 25 लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींना यापूर्वी अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजहर मंजूर शेख (वय 35, रा. फकीर गल्ली, नगर) हा पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी झाला. त्याला शोधण्याकरिता पोलिसांनी त्यांची यंत्रणा कामास लावली होती. हुंडेकरी अपहरण प्रकरणातील आरोपी अजहर शेख हा शिवनी (मध्य प्रदेश) येथे एका खेड्यामध्ये राहत असल्याची माहिती खबर्याकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मिळाली. यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस व कर्मचारी यांनी खवासा, शिवनी, (मध्य प्रदेश) येथे जाऊन आरोपीची माहिती घेतली असता तो दिवसभर पेंच अभयारण्य परिसरात लपवून रात्री वेशांतर करुन राहत असलेल्या घरी मुकामाला येत असल्याचे माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या राहत्या घराजवळ सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली.
पोलिसांनी या गुन्ह्यातील निहाल उर्फ बाबा मुशर्रफ शेख (रा. जालना) यास एका अल्पवयीन साथीदारासह ताब्यात घेतले आहे. तेव्हापासून अजहर हा फरार होता. पोलिसांनी त्यास तोफखाना पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहायक पोलिस निरिक्षक शिशीरकुमार देशमुख, पोलिस हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलिस नाईक संतोष लोंढे, दिपक शिंदे, रविंद्र कर्डिले, रवी सोनटक्के, पोलिस शिपाई मच्छिंद्र बर्डे, सागर ससाणे, प्रकाश वाघ, राहुल सोळुंके यांनी केली आहे.
Tags:
Ahmednagar
