झेंडय़ात शिवमुद्रेचा वापर, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस


 झेंडय़ात शिवमुद्रेचा वापर, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस

मुंबई  (दि.14) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर पक्षाच्या झेंडय़ात केल्याच्या मुद्दय़ावरून राज्य निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस बजावली आहे. आता या नोटीसला मनसेच्या वतीने काय उत्तर दिले जाणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचा झेंडा बदलायचा निर्णय घेतला. मनसेच्या यापूर्वीच्या झेंडय़ात पूर्णपणे बदल करून शिवमुद्रा मध्यभागी असलेला भगवा झेंडा मनसेने तयार केला आहे. मनसेच्या महाअधिवेशनात या नवीन झेंडय़ाची घोषणा झाली. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात काढलेल्या महामोर्चामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हाच नवीन झेंडा फडकवला होता. मात्र या झेंडय़ामध्ये शिवमुद्रा वापरल्याने त्याला आक्षेप घेण्यात आला आहे. 

संभाजी ब्रिगेड, जय हो फाऊंडेशन आणि अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मनसे हा राजकीय पक्ष असून राजकीय पक्षाने थोर व्यक्ती व चिन्हांचा गैरवापर केला असल्याच्या आशयाची ही तक्रार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post