दुधातील भेसळ रोखण्यासाठी आता क्यूआर कोडचा वापर



दुधातील भेसळ रोखण्यासाठी आता क्यूआर कोडचा वापर

मुंबई  (दि.14) :  राज्यातील दुधाची भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून दूध उत्पादक शेतकरी, संकलन केंद्र, दुधावरील प्रक्रिया केंद्र या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून भेसळ करणार्‍यापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

दुधातील भेसळ रोखण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक बोलावली होती. यावेळी डीएनव्ही - जीएल आणि आयआरक्यूएस या कंपनीने दुधातील भेसळ आणि दुधाचा दर्जा राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो याचे सादरीकरण केले.

स्वच्छतेवर लक्ष केंद्रित

दुधातील गुणवत्ता, दर्जा राखण्याकरिता शेतकरी दूध काढण्यासाठी हातमोजे वापरतो किंवा नाही, दूध काढण्याचे भांडे, दूधसंकलन केंद्राच्या ठिकाणचा परिसर स्वच्छ आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे. दूधसंकलन केंद्र आणि दुधाची प्रक्रिया करण्यात येणार्‍या ठिकाणी पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले.

भेसळमुक्त राज्य

दुधातील भेसळ रोखल्याने शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक परिणाम दिसतील. दुधातील भेसळ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून ‘भेसळमुक्त राज्य’ करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post