मैदानी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमातून कर्मचार्‍यांना नवी ऊर्जा मिळेल : राजश्री घुले



मैदानी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमातून कर्मचार्‍यांना नवी ऊर्जा मिळेल : राजश्री घुले
 
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

 नगर (दि.15) : कोणत्याही क्षेत्रात काम करताना ताणतणावांना सामोर  जावे लागते. शासकीय सेवेतही अधिकारी, कर्मचार्‍यांना नियमांच्या चौकटीत राहून अतिशय काळजीपूर्वक आपले कर्तव्य पार पाडावे लागते. अशावेळी स्वत:चे मानसिक व शारीरिक आरोग्य राखणे महत्त्वाचे असते. यासाठी आवडीचा छंद जोपासणे, मैदानावर मोकळ्या हवेत खेळणे यासाठी वेळ काढायला पाहिजे. जिल्हा परिषदेमार्फत होत असलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांतून सर्वांना एक वेगळा आनंद मिळेल असा विश्वास वाटतो. लहानपणी खेळत असलेले खेळ काळाच्या ओघात विसरले जातात. ते बालपण या स्पर्धेनिमित्त जागे होण्यास मदत होईल. स्पर्धेतून निर्माण होणारे खेळीमेळीचे वातावरण प्रत्येकाला नवी ऊर्जा देणारे ठरेल. यातूनच सर्वांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. त्याचा फायदा प्रत्येकाला त्यांचे दैनंदिन कामकाज करताना होईल, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्यावतीने कर्मचार्‍यांसाठी आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना शुक्रवारी वाडिया पार्क क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षा घुले बोलत होत्या. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, सभापती सुनिल गडाख, काशिनाथ दाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जि.प.सदस्य शरद नवले, माधवराव लामखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, परिक्षित यादव, डॉ.सुनिल तुंबारे, श्रीकांत अनारसे, संजय कदम, नितीन उबाळे, निखील ओसवाल, सुनिलकुमार राठी, क्रीडा अधिकारी कविता नावंदे आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील म्हणाले की, बदलती जीवनशैली व कामाचा अतिरिक्त ताण यामुळे प्रत्येकालाच मानसिक शांती हवी असते. नियमित व्यायाम, खेळाने आरोग्य चांगले राहते. डॉक्टर मंडळीही छंद जोपासण्याचा व मैदानावर फिरणे, व्यायाम करणे यासाठी वेळ काढण्याचा सल्ला देत असतात. जिल्हा परिषदेच्या या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धातून कर्मचार्‍यांमधील सुप्त गुणांना चांगले व्यासपीठ मिळणार आहे. प्रत्येकाने खिलाडूवृत्तीने यात सहभागी होवून स्पर्धेचा आनंद लुटावा.

प्रास्ताविकात वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, तीन दिवसांच्या या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खोखो, धावणे, जलतरण, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम अशा विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. सर्व स्पर्धांसाठी कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त नोंदणी केली आहे. याशिवाय सांस्कृतिक स्पर्धातही अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post