सहकारी पतसंस्थांनी नियमांचे पालन करुन पारदर्शक कारभार करावा : मंत्री बाळासाहेब पाटील

 
सहकारी पतसंस्थांनी नियमांचे पालन करुन पारदर्शक कारभार करावा : मंत्री बाळासाहेब पाटील
 
शिर्डी (दि.15) :  सहकारी पतसंस्थांनी उल्लेखनीय कार्य करुन नागरिकांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून आणला आहे. पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रुजली असून, या सेवा देणाऱ्या संस्था असल्याने सहकारी पतसंस्थांनी नियमांचे पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज येथे केले.

सहकार विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सहकार प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्रातील नागरी, पगारदार, महिला, ग्रामिण बिगरशेती, मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार संवाद व मेळावा आयोजित करण्यात आला होता. मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या सहकार संवाद मेळाव्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खा. हेमंत पाटील,आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इलेनिता सँड्रॉक, नेपाळच्या सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष परितोष पौडयाल, नॅफकॅबचे अध्यक्ष उदय जोशी, कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष बी. एच. कृष्णारेड्डी, राज्याचे अपर निबंधक डॉ. पी. एल. खंडागळे, नाशिकच्या सहकारी संस्था विभागीय सहनिबंधक श्रीमती ज्योती लाटकर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उषाताई तनपुरे, सहकार भारतीचे मुकुंद तापकीर, बुलढाणा अर्बनचे संचालक मुकुंद झवर उपस्थित होते.

मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, निकोप वाढीसाठी सहकारी पतसंस्थांनी सवंग लोकप्रियता आणि व्याज दरातील स्पर्धा टाळावी आणि सकारात्मक बदल करावा. युवकांनी सहकार चळवळीत सहभागी व्हावे यासाठी, सहकारी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा. राज्य शासन पतसंस्थांच्या पाठीशी असून सहकारी पतसंस्थांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याचे यावेळी सांगितले.

खा.हेमंत पाटील यांनी, शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून वितरित करण्यात यावे अशी मागणी केली. अपर सहकार निबंधक पी. एल. खंडागळे यांनी सहकारी पतसंस्थांनी नियमांचे पालन करुनच कर्ज वाटप करावे आणि कामकाज पारदर्शक पद्धतीने करावे अशी सूचना केली.

Post a Comment

Previous Post Next Post