दिव्यांगांना प्रत्येकाने आपुलकीची वागणूक द्यावी : डॉ. मीनल काळे
साई सामाजिक प्रतिष्ठानतर्फे मतिमंद मुलांच्या शाळेत आरोग्य शिबिर
नगर (दि.15 ) : समाजात वावरत असताना स्वमग्न न होता प्रत्येकाने वंचित व गरजूंना आधार देणे गरजेचे आहे. दिव्यांगांना आपुलकीची आणि प्रेमाची वागणूक देऊन प्रत्येकाने माणुसकी जपावी, असे प्रतिपादन मीरा क्लिनिकच्या डॉ.मीनल काळे यांनी केले.
सामाजिक बांधिलकीतून सावेडी येथील साई सामाजिक प्रतिष्ठानतर्फे तपोवन रोडवरील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्या वेळी डॉ. काळे बोलत होत्या. या वेळी प्रतिष्ठानचे निखिल जाधव, अक्षय अकोलकर, स्वप्नील वाघ, असलम सय्यद, मुख्याध्यापक बाळासाहेब केदार, सुवर्णा कदम आदी उपस्थित होते.
साई सामाजिक प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी मतिमंद मुलांच्या निवासी शाळेला भेट देऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. मीनल काळे यांनी केली. त्यांना सुवर्णा कदम यांनी सहकार्य केले. या वेळी विद्यार्थ्यांना औषधांचेही वाटप करण्यात आले.
या वेळी प्रतिष्ठानचे स्वप्नील वाघ म्हणाले की, मतिमंद विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रतिष्ठानचे नेहमीच सहकार्य राहील. वंचित विद्यार्थ्यांना प्रेमाची वागणूक देऊन त्यांचे जीवन सुखकर करणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. शिबिरासाठी शाळेच्या शिक्षक-कर्मचार्यांनी सहकार्य केले.
Tags:
Ahmednagar
