जिल्हा रुग्णालयात ‘प्रभारी’राज कायम!

 
 
जिल्हा रुग्णालयात ‘प्रभारी’राज कायम !

भारतीय जनसंसदेचा आंदोलन छेडण्याचा इशारा

नगर (दि.14) : जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये प्रभारीऐवजी कायमस्वरुपी जिल्हा शल्यचिकित्सक यांची नेमणूक करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय, अहमदनगर येथे सध्या जिल्हा शल्य चिकित्सक हे पद प्रभारी आहे. प्रभारी नियुक्ती ही त्याच कार्यालयातील कनिष्ठ पदांवरील अधिकार्‍यांना दिली जाते. त्यामुळे इतर समकक्ष अधिकारी संबंधितास पुरेसा मान देत नाहीत. याचा परिणाम म्हणून प्रशासनावर वचक रहात नाही.

पर्यायाने प्रशासकीय शिस्त बिघडते आणि जनहिताची कामे रखडतात. सध्या हा प्रकार जिल्हा शासकीय रुग्णालयामधे निदर्शनास येतो आहे. बहुतेक बाह्यरुग्ण तपासणी विभागाचे डॉक्टर्स प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनामध्ये व इतरत्र गप्पा मारत बसतात. ओ.पी.डी. ला डॉक्टर्स नसल्यामुळे जिल्हयातून आलेल्या रुग्णांची कुचंबणा होते.

त्यांना आर्थिक,मानसिक त्रास घडतो. विशेष बाब म्हणजे सन 1938 ते सन 2010 पर्यंत जिल्हा शासकिय रुग्णालय, अहमदनगर येथे प्रभारीराज कधीच नव्हते. मात्र, 2010 नंतर प्रभारी राज ची लागण झाली. 2017 नंतर मात्र जिल्हा शल्यचिकित्सक हे पदच पूर्णपणे नष्ट झाले आहे. सध्याचे सीएस बहुतेक वेळा स्वतः आजारी असून जिल्हा शासकीय रुग्णालयाऐवजी खासगी दवाखान्यात महागडे उपचार घेऊन शासकीय पैशांची धुळधाण करणारे डॉ. प्रदीप मुरूंबीकर हे 15 मे 2018 ते आजतागायत प्रभारी आहेत. ही बाब रुग्णांच्या हिताची नाही. प्रभारीऐवजी कायमस्वरुपी डॉक्टरांची नियुक्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन, अशोक ढगे, कैलास पठारे, डॉ. प्रशांत शिंदे, वीर बहादर प्रजापती, बबलू खोसला, भगवान जगताप, पतंगे, भैय्या पठाण, किट्टू खोसला, रशिद शेख, राजू घोरपडे व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post