महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली ; राज्यातील राजकीय वातावरण तापले


मुंबई : दरवर्षी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी राजपथावर धावणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यामागे काही षडयंत्र आहे का? राजकीय विचार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
यामागे षडयंत्र आहे का? - सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले, दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत जातो. आपल्याला बक्षीसही मिळाले आहे. जे मूल बोर्डात पहिले येते ते नापास झाल्यावर आईवडिलांना धक्का बसतो, तसाच मलाही बसला आहे. पण यामागे काही षडयंत्र आहे का? राजकीय विचार आहे का? असाही प्रश्न पडतो. कारण नेमके पश्चिम बंगाल महाराष्ट्र ही दोन राज्ये यात नाहीत. समितीचे काम पारदर्शकपणे होते असे सांगितले जाते, पण माझा त्यावर तितकासा विश्वास नाही, असेही त्या म्हणाल्या.
.तर भाजपाने बोंबाबोंब केली असती - संजय राऊत
संजय राऊत यांनीदेखील केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण राहिला आहे. अनेकदा पहिला क्रमांकही मिळाला आहे. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे? हेच काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, आज गप्प का? महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ दिसू नयेत, यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post