शरद पवार यांच्या विश्‍वासाला तडा जावू देणार नाही : ना. प्राजक्त तनपुरे

नगर (दि.04)  - जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठराणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्याला गती देवून जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या पाणीयोजना, रस्ते व मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करू. भौगोलिकदृष्ट्या जिल्हा विभाजन झाले तर चांगलेच आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नवीन पोलिस अधीक्षकांची तातडीने नियुक्ती केली जाईल, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दाखवलेल्या विश्‍वासाला तडा जावू देणार नसल्याने राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्याच्या मंत्रिमंडळात राहुरी मतदारसंघाचे आ. प्राजक्त तनपुरे यांची राज्यमंत्री म्हणुन निवड झाल्यानंतर ते प्रथमच नगर जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. ना. प्राजक्त तनपुरे म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणुन मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संधी दिली आहे. ते जी जबाबदारी देतील ती यशस्वीपणे पार पाडू. जिल्ह्यात विविध प्रश्‍न प्रलंबित असून बेरोजगारीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. यासाठी जिल्ह्यात नवीन कंपन्या आणण्याचा प्रयत्न केला जाईल. राहुरी मतदार संघातील अनेक प्रश्‍न प्रलंबित असून यामध्ये ग्रमीण रुग्णालय, एमआयडीसी, एसटीबस स्थानक, पाणी योजना, रस्ते दुरुस्ती अशी मुलभूत कामे प्राधान्याने कली जातील. वांबोरी चारीसाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला असून प्रलंबित कामे तातडीने केली जातील, असे सांगत ना. तनपुरे म्हणाले, जिल्ह्याला पोलिस अधीक्षक नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासाठी जिल्ह्याला तातडीने नवीन पोलिस अधीक्षकांची नियुक्ती केली जाईल. निळवंडे धरणाच्या कालव्यांना व प्रलंबित मुलभूत सुविधांच्या कामांना गती देवून ती तातडीने पूर्ण करण्यात येतील. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जातील. पाच वर्षात चांगली व जास्तीत जास्त कामे करून जिल्ह्याला विकासाचे मॉडेल बनवू, असेही ना. तनपुरे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post