| अहिल्यानगर/शेवगाव | दि.14 मार्च 2026 | शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथे शुक्रवारी (दि.13) मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी हल्ला करत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात भीषण दरोडा टाकल्याची घटना घडली.दरोडेखोरांनी चाकू व तलवारीचा धाक दाखवत घरातील कपाटे फोडून सुमारे 70 ते 75 लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे नागलवाडी व परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंगराळ भाग व मराठवाड्याच्या सरहद्दीवर भगवानगडच्या पायथ्याशी असलेल्या नागलवाडी गावातील सेवानिवृत्त शिक्षक राम मारुती गीते वय 65 हे पत्नी छाया गीते यांच्यासह शुक्रवारी रात्री घरी झोपलेले असताना मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला.
त्यानंतर दरोडेखोरांनी दोघांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवत घरातील कपाटांची उचकापाचक केली. दरोडेखोरांनी घरातील या दरोड्यात सुमारे 55 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गंठण, अंगठ्या, राणीहार, बांगड्या, मंगळसूत्र, लॉकेट, कानातील दागिने असा मौल्यवान 55 तोळे दागिने तसेच 1 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण अंदाजे 70 ते 75 लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरोडेखोरांनी काही वेळ घरात धिंगाणा घालत मौल्यवान वस्तू गोळा केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. भयभीत झालेले गीते पतिपत्नी लगत राहणाऱ्या खेडकर कुटुंबाला माहिती दिली त्यानंतर आरडाओरड झाल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली.
घटनेची माहिती मिळताच रात्री स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले मात्र शनिवारी सकाळी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपाधिक्षक राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, ठसे तज्ञ पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
