‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’चा शुभारंभ
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त
डिजिटल युगातही वाचन संस्कृती अबाधित, ग्रंथोत्सव ज्ञानपरंपरेचा सन्मान : विखे पाटील
| अहिल्यानगर | दि.31 मार्च 2026 | ग्रंथांना आपण ‘गुरू’ची उपमा देतो. जसा गुरू शिष्याला ज्ञानाने समृद्ध करतो, तसेच ग्रंथ वाचकाला वैचारिक व बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करतात. डिजिटल क्रांतीच्या युगात काळ बदलत असला तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, ती नव्या माध्यमांतून अधिक व्यापक होईल, असा विश्वास शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून समाजातील सर्व घटकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती विखे पाटील बोलत होत्या.
यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे, सरपंच कल्पना मैड, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहायक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलूलकर, प्रा. गणेश भगत, चंद्रकांत पालवे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्य राम पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती विखे पाटील म्हणाल्या, जिल्ह्याला साहित्य व अध्यात्माची समृद्ध परंपरा लाभली असून संत ज्ञानेश्वर यांनी ‘ज्ञानेश्वरी’ या अमर ग्रंथाची निर्मिती याच भूमीत केली. तसेच संत कवी महिपती महाराज व संत निळोबाराय यांसारख्या संतांनी आध्यात्मिक ग्रंथनिर्मितीत मोलाचे योगदान दिले. अनेक साहित्यिकांच्या कार्यामुळे जिल्ह्याची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख निर्माण झाली असून हा वारसा जतन करण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आज समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी पुस्तक हातात घेऊन वाचन करण्याचा जो आनंद आहे, तो इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळू शकत नाही. ई-लायब्ररी संकल्पना सर्व शाळांमध्ये सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ज्ञानसंपदा उपलब्ध करून दिली जात आहे. पारंपरिक वाचन संस्कृती टिकवून ठेवणे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ४५७ ग्रंथालयांना ३ कोटी ९ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. राहता येथे डिजिटल उपकेंद्रासाठी जागा व ५ कोटी रुपयांचा निधी तसेच पाथर्डी येथील उपकेंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त इमारतीच्या बांधकामासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. मराठी साहित्याचा समृद्ध वारसा अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून वाचनाची सुरुवात करावी आणि प्रत्येक गावात वाचन चळवळ उभी राहिली पाहिजे.साहित्यसंपदेच्या संवर्धनासाठी समाजाने अधिक पाठबळ देणे ही काळाची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य साहित्यसंपदेने समृद्ध असून संत साहित्यापासून आधुनिक वैचारिक प्रवाहांपर्यंतची परंपरा आपल्या समाजाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वैभवाची साक्ष देते. दिवाळी सणानिमित्त विविध मासिकांद्वारे प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांच्या माध्यमातून लेखनाचा उत्सव साजरा केला जातो, ज्यामुळे नवोदित व प्रस्थापित लेखकांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळते आणि वाचन संस्कृतीला चालना मिळते. ग्रंथसंपदेचे जतन व संवर्धन ही केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी असून, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक ग्रंथालयांसह डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे.
दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथांचे डिजिटायझेशन करून ते व्यापक वाचकवर्गापर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या जिल्ह्यात डिजिटल केंद्र उभारणीची संकल्पना अत्यंत वाखाणण्याजोगी व काळानुरूप असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्र. संचालक अशोक गाडेकर म्हणाले, राज्यात दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून वाचन संस्कृतीचा प्रसार हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ग्रामीण स्तरापर्यंत ज्ञानाचा दीप पोहोचावा व गावागावातील वाचकांना दर्जेदार साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी यंदाचा ग्रंथोत्सव ग्रामीण भागात आयोजित करण्यात आला आहे.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर येथे डिजिटल ग्रंथालय उभारणीचे काम सुरू असून राहता व पाथर्डी येथे डिजिटल उपकेंद्रे स्थापन करण्यात येत आहेत, ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नामवंत लेखकांची दर्जेदार अशी पुस्तके प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमस्थळी आकर्षक पद्धतीने पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले होते. विविध नामांकित प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांना विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी विविध सार्वजनिक वाचनालयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ग्रंथवाचकांचाही गौरव करण्यात आला.अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५ निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनींसह, साहित्यिक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
👉 क्लीक करुन वाचा साप्ताहिक विजयमार्ग
