। पुणे । दि.25 मार्च । केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणानी परिसर दणाणला होता.
यावेळी पदाधिकार्यांनी गॅस सिलेंडरला प्रतीकात्मक पद्धतीने फासावर लटकवले. तसेच मोदी तेरा अजब खेल सस्ती दारु, मेहेंगा तेल, मोदी सरकार हाय हाय, सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणार्या मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी बोलताना पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, 2014 साली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्यांचे भांडवल करत भारतीय जनता पार्टी सत्तेत आली.
सत्तेत आल्यानंतर मात्र ज्या सर्वसामान्य भारतीयांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवले, त्या सर्वसामान्य जनतेचा मात्र भाजपला विसर पडला. त्यावेळेस 300 रुपयांना मिळणारा सिलेंडर आज तब्बल 1000 रुपयांवर गेला आहे.
पेट्रोल, डिझेल यांच्या दराने शंभरी पार केली आहे. तरीसुद्धा सातत्याने दररोज हे दर वाढवून सर्वसामान्यांची लुटमार ही सुरूच आहे. निवडणुका आल्या की दर स्थिर ठेवायचे, निवडणुका गेल्या पुन्हा सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकायचा, हीच खरी भाजपची नीती आहे.
आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संदीप बालवडकर महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, संतोष फरांदे, उदय महाले, काकासाहेब चव्हाण, संतोष नांगरे, गणेश नलावडे, दिलशान आतार, अनिता पवार, शिल्पा भोसले यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags:
Politics
