वांबोरी चारीला “स्व. आमदार शिवाजीराव कर्डीले” यांचे नाव देण्याची मागणी – ४५ गावांच्या ग्रामस्थांकडून पालकमंत्रींकडे प्रस्ताव सादर
“शिवाजीराव कर्डीले यांनी शेतकऱ्यांचे ६० वर्षांचे स्वप्न साकार केले – त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ योजना नाव देण्यात यावी” वैभव ढाकणे यांची मागणी
। अहिल्यानगर । ०6 नोव्हेंबर 2025 । राहुरी, नगर, नेवासा आणि पाथर्डी तालुक्यांना संजीवनी ठरलेल्या वांबोरी चारी टप्पा-1 आणि टप्पा-2 या सिंचन योजनांना स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी वैभव भाऊराव ढाकणे यांनी सर्व लाभधारक ग्रामस्थांच्या सहीसह जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
या योजनेमुळे सुमारे 45 गावांतील 102 पाझर तलावांना पाणीपुरवठा होत असून, डोंगराळ आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या दूर झाल्या आहेत. 1995 मध्ये तत्कालीन युती सरकारमधील उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेण्यात स्व. आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
1990-91 साली माजी खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांनी या प्रकल्पावर प्राथमिक बैठक घेतली होती. मात्र, कर्डीले साहेबांच्या सततच्या प्रयत्नांमुळे 1999 मध्ये योजनेला मंजुरी मिळाली आणि 2011 मध्ये ती कार्यान्वित झाली.
या प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाचा लाभ मिळत आहे. म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या योजनेला “स्व. आमदार शिवाजीराव कर्डीले वांबोरी चारी टप्पा-1” आणि “स्व. आमदार शिवाजीराव कर्डीले वांबोरी चारी टप्पा-2” अशी नावे देण्यात यावीत, अशी मागणी अर्जामध्ये करण्यात आली आहे.
👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग
या मागणीला सर्व लाभधारक गावांतील ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा असून, या प्रसंगी सरपंच श्रीकांत आटकर, सोमनाथ कुरहे, शिवाजी पालवे, बाबाजी पालवे, अजिंक्य शिंदे, शरद कुरहे, देविदास शिंदे, निलेश कदम, आबा गरुड, संदीप दानवे, ओंकार आव्हाड आदी उपस्थित होते.
👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग
वैभव ढाकणे यांनी सांगितले की, “शिवाजीराव कर्डीले साहेब यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आयुष्य झटवले. त्यांच्या नावाने ही योजना ओळखली जावी, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
