आधारभूत दरानुसार मूग, उडीद व सोयाबीन खरेदीस १५ नोव्हेंबरपासून सुरुवात

आधारभूत दरानुसार मूग, उडीद व सोयाबीन खरेदीस १५ नोव्हेंबरपासून सुरुवात

 


। अहिल्यानगर । 10 नोव्हेंबर 2025 ।  महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी ३० ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहे.


केंद्र शासनाने मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांसाठी खालीलप्रमाणे आधारभूत दर निश्चित केले आहेत —

मूग : रू. ८,७६८ प्रति क्विंटल,
उडीद : रू.७,८०० प्रति क्विंटल,
सोयाबीन : रू.५,३२८ प्रति क्विंटल.

राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोन्ही केंद्रीय नोडल एजन्सींना खरेदीसाठी जिल्ह्यांचे वाटप करण्यात आले आहे. नाफेडच्या वतीने अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, परभणी, पुणे, सांगली, सातारा, वर्धा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये खरेदी सुरू होणार आहे.


तर राज्य सहकारी पणन महासंघ (एनसीसीएफ) च्या वतीने नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, हिंगोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यांमध्ये खरेदी प्रक्रिया राबविण्यात येईल.


केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गावाजवळील नाफेड किंवा एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी.


नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने पीओएस मशीनद्वारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा ७/१२ उतारा, पीकपेरा आदी कागदपत्रांसह प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.


खरेदीसाठी एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच शेतमाल विक्रीकरिता खरेदी केंद्रावर आणावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील आणि संचालक मंडळ यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post