चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड : उपमुख्यमंत्री


| मुंबई | दि.24 नोव्हेंबर २०२५ |  हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले, ‘चुपके चुपके, ‘अनुपमा, ‘सत्यकाम, ‘दिल्लगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. 

विशेषतः ‘शोले’ मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे. धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवले होते. त्यांचे देखणे व्यक्तिमत्त्व आणि दमदार अभिनयामुळे त्यांना ‘हिंदी सिनेमा’चा ‘ही-मॅन’  म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबिय, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री पवार यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post