महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले....!


| अहिल्यानगर | दि.३० ऑक्टोबर २०२५ | शहरातील वर्दळीच्या समजल्या जाणार्‍या प्रोफेसर चौक परिसरात सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले आहे. मॉर्निंग वॉक करून भाजीपाला घेऊन घरी परतणार्‍या रिया महेश पमनानी (वय ५०) यांच्या गळ्यातील तब्बल ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, विनायक पार्क कॉलनी येथील रहिवासी असलेल्या रिया पमनानी या नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. वॉक संपल्यानंतर भाजीपाला घेऊन त्या समर्थ शाळेसमोरील रावसाहेब पटवर्धन स्मारकाजवळून प्रोफेसर चौकाकडे पायी जात होत्या. सकाळी साडेआठच्या सुमारास, त्यांच्या समोरून एका मोटारसायकलवर दोन इसम आले. 

 

महिलेला काही कळण्याच्या आतच मोटारसायकलवर मागे बसलेल्या इसमाने, ज्याने काळ्या रंगाचे जर्किंग आणि तोंडाला काळा मास्क लावला होता, त्याने पमनानी यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर झडप घालून ते बळजबरीने ओढले. पमनानी यांनी आरडाओरड करत चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.


मात्र ते वेगाने प्रोफेसर चौकाच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. या मंगळसूत्रात ९.५ ग्रॅम वजनाची चेन आणि १.५ ग्रॅमचे पेंडंट होते, ज्याची एकूण किंमत ६०,००० रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post