खडकी वाळकी परिसरात पूरपरिस्थिती
लष्कराच्या मदतीने आपत्ती निवारण कार्य सुरु
। अहिल्यानगर । दि.27 मे 2025 । अविरत पडणार्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी व वाळकी गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली असून, रहिवासी अडकून पडले आहेत.
हे गाव सैन्याच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (ACC&S) पासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. याठिकाणी लष्कराच्यावतीने मदतकार्य राबविण्यात येत आहे. यात खडकी येथून 10 व वाळकी येथून 15 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ (ACC&S) येथून एक मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले.
तसेच प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 25 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दोन दिवसांच्या पावसाने सर्वत्र पाण्याची पातळी वाढली असून मुसळधार पावसाने अहिल्यानगर तालुक्यातील खडकी, वाळकी गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
Tags:
Breaking