। पुणे । दि.09 जुन 2024 । वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात देखील दाखल झाला असून, मान्सूनने राज्यातील बहुतांश भाग व्यापून काढला आहे. शनिवारी रात्री मुंबई आणि पुणे शहराला चांगलेच झोडपून काढल्यानंतर आता पुढील ४८ तासांत राज्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
त्यातच सिंदुधदुर्गाला रेड अलर्ट तर विदर्भाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आणि मुंबईमध्ये झालेल्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली होती. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील ४८ तासामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून, याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या काही तासांतच मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शयता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबईत ठीकठिकाणी पावसाने हजेरी लावली. दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, कुलाबा, वांद्र्यात पावसाने हजेरी लावली.
पुढील ३-४ तास मुंबईत पावसाची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. तर तशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे हवामान खात्याने आवाहन केले. शनिवारी मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला. तर पुणे शहरात देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. आता राज्यातील इतर भागात देखील येत्या २ दिवसात वरुणराजाचे जोरदार आगमन होणार आहे.
Tags:
Maharashtra
