। अहमदनगर । दि.7 ऑगस्ट 2023 । लोकाभिमुख कामांचा करुया निपटारा चला करू 'महसूल सप्ताह' साजरा हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यात महसूल सप्ताह विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान,आरोग्य तपासणी शिबीर तसेच नेत्रदान व अवयव दान बाबत संमती पत्र प्राप्त करून घेण्याचा कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्तपणे संपन्न झाला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गंगाराम तळपाडे, जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजल्या जाते. समाजाचे आपलेही काही देणे लागते ही भावना अंगी रुजवून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करण्याबरोबरच मरणोत्तर आपले अवयव दान करून समाजातील गरजूंना नवीन आयुष्य मिळावे यादृष्टीने अधिकाधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अवयव दानाचा संकल्प करून संमतीपत्र देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Tags:
Ahmednagar
