चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत
कोतवाली पोलीस ठाण्याची कामगिरी । दोघे अटकेत
। अहमदनगर । दि.12 जुलै 2023 । चोरीच्या मोटरसायकली नंबर प्लेट काढून विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. मिसाम अली हरमान अली रिजवी (वय 20 वर्ष, रा.जामा मशिदजवळ, कानपुर, उत्तरप्रदेश), आकाश मोतीलाल कोटवाल (वय 26 वर्षे, रा. हनुमान मंदिराच्याजवळ चारनेरवाडी ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर, ह.रा.माणिकचौक, चाकण जि. पुणे) अशी आरोपींची नावे असून, दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीच्या मोटरसायकल चोरी करून बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार केडगाव परिसरात गस्त घालत असताना हॉटेल के-9 जवळ एका विना नंबरच्या बजाज पल्सर मोटरसायकलवर एक जण संशयितरित्या पोलिसांना आढळून आला. त्याला नाव विचारले असता मिसाम अली हरमान अली रिजवी असे सांगितले.
मोटरसायकलचे कोणतेही कागदपत्र त्याच्याकडे नसल्याचे आढळून आले. मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली दिल्याने 50 हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली. तसेच, मंगळवारी (दि.11) पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळाली की, कायनेटीक चौक येथे एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्याकरिता येणार आहे.
या माहितीच्या आधारे आकाश मोतीलाल कोटवाल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीची 70 हजार रुपये किमतीची पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली. या दोन्ही मोटरसायकली आरोपींनी पुणे येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात माहिती घेतली असता त्या ठिकाणी प्रवीण भुसारी (रा. चिखली तळेगाव) आणि वैभव टोणपे (रा. भोईटे नगर, खडकी, पुणे) यांच्या गाड्या चोरी झाल्याबाबत गुन्हे दाखल होते.
त्यावरून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना कळवून आरोपी आणि वाहने त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, अभय कदम, सुजय हिवाळे, सुमित गवळी, दीपक रोहकले, प्रमोद लहारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
