। मुंबई । दि.19 जुलै 2023 । ‘‘होय, हा कुटुंब वाचवण्याचा लढा आहे आणि अवघा भारत हेच आमचे कुटुंब आहे,’’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठणकावून सांगितले. आमची लढाई कुणा एका पक्षाच्या विरोधात वा एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर हुकूमशाहीविरोधात आहे, असे नमूद करत आम्ही विजयी होणारच, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
भाजपविरोधात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ऐक्याची वज्रमूठ आवळली गेली आहे. आज ‘इंडिया’ या नव्या राष्ट्रीय आघाडीची घोषणा झाली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य करत परखडपणे भूमिका मांडली. हुकमूशाहीविरोधात जनता एकजूट होत आहे. आज आमची दुसरी बैठक यशस्वीरीत्या पार पडली. ‘इंडिया’ हे आघाडीचे नावही घोषित झाले आहे. इंडिया म्हणजेच भारतासाठी आम्ही सारे लढत आहोत आणि हा लढा आम्हाला पुढे न्यायचा आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पाटणा आणि आता बंगळुरू अशा दोन बैठका झाल्या आहेत. आजची बैठक यशस्वी ठरली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार या सगळ्यांनाच मी धन्यवाद देईन. त्यांनी चांगले आयोजन केले. आता पुढची बैठक महाराष्ट्रात मुंबईत आपण घेऊ. त्याची तारीख ठरेलच, असे उद्धव ठाकरे यांनी पुढे नमूद केले.
Tags:
Maharashtra
