सत्ता संपादनाचा खटाटोप झाला असेल तर शेतकर्‍यांना नुकसार भरपाई द्या : सुधीर भद्रे


। अहमदनगर । दि.19 जुलै 2023 । सत्ता संपादनाच्या खटाटोपातून वेळ मिळाला असल्यास नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांना द्यावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे.

खरीप हंगाम 2022 मधे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मूग, बाजरी, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर, कांदा आणि फुल शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतकर्‍यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाने चिचोंडी पाटील ता.जि.अहमदनगर येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत शेतकर्‍यांचा मोर्चा काढला होता. 

शासनाने तदनंतर पंचनामे तातडीने केले, मात्र नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे जनआंदोलनाने 31 डिसेंबर 2022 ची रात्र जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर समोर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागून काढली .

मात्र शासनाला दुसर्‍याची सत्ता काढून स्वतःची सत्ता आणण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ खर्ची घालावा लागल्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई चे भान राहिले नाही.  त्यामुळे 19 मे रोजी तलाठी व मंडळाधिकारी कार्यालय चिचोंडी पाटील येथे आंदोलन करण्यात आले.

आदरणीय मुख्यमंत्री यांच्यासोबतच आदरणीय पालकमंत्री हे सुद्धा आठ दिवसात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे म्हणतात मात्र आता आठ महिने उलटूनही शेतकर्‍यांना ढबू मिळालेला नाही .विशेष म्हणजे पुन्हा दुष्काळी परिस्थिती उदभवली आहे .काही ठिकाणी अजिबात पाऊस नाही तर काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे .

यामुळे सत्ता संपादनाच्या खटाटोपातून वेळ मिळाल्या असल्यास अहमदनगर जिल्ह्याच्या 14 तालुक्यातील सुमारे सात लाख शेतकर्‍यांचे साडेचार लाख हजार हेक्टर क्षेत्रावरील बाधित झालेल्या पीक नुकसानीचे पैसे तातडीने द्यावेत असा टोला ज्येष्ठविधीज्ञ कारभारी गवळी, राज्यसचिव अशोक सब्बन, वीर बहादुर प्रजापती, सुनील टाक व जिल्हाध्यक्ष  सुधीर भद्रे यांनी लगावला आहे .

Post a Comment

Previous Post Next Post