आठरे पाटील पब्लिक स्कूलकडून विद्यार्थ्यांची दाखल्या अभावी पिळवणूक
शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने मनपा शिक्षणाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन
। अहमदनगर । दि.21 जुलै 2023 । शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने मनपा शिक्षणाधिकारी यांच्या दालनात सावेडीतील एका शाळेतील उर्वरित विद्यार्थ्यांची दाखले देण्याकरता ठिय्या आंदोलन करण्यात आले. यानंतर शाळेने दाखले न दिल्यास येत्या 25 तारखेला मनपा शिक्षण अधिकारी यांच्या दालनात अर्धनग्न आंदोलन शिवराष्ट्र पक्षाचे संघटन मंत्री नवनाथ मोरे यांच्या नेतृवाखाली करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवराष्ट्र सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे, जिल्हा अध्यक्ष सतिष जपकर, शुभांगी साठे, अरुण चव्हाण, प्रशांत भिंगारदिवे, उपस्थित होते.
यावेळी संतोष नवसुपे यांनी सांगितले, कोरोना - 19 महामारी मध्ये भिंगार येथील प्रियदर्शनी हायस्कूल व सावेडी येथील आठरे पाटील पब्लिक स्कूल या ठिकाणी पालकांना व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करून कोरोना महामारीत मोठा त्रास देण्यात आला. यावेळी पालकांनी आपले विद्यार्थी इतर शाळेमध्ये नाव दाखल करण्याकरीता या दोन्हीही हायस्कूलमध्ये दाखले देण्याची विनंती केली.
परंतु शासन निर्णय असताना देखील मोठ्या प्रमाणात या दोन्ही शाळेकडून ही वसुलीची मागणी करण्यात आली. यावेळी पालकांच्या मदतीसाठी शिवराष्ट्र सेनेने जिल्हाधिकारी साहेब तसेच पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी तसेच मनपा शिक्षणाधिकारी यांच्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून 15 ते 20 विद्यार्थ्यांना या आंदोलनामुळे फी न भरता दाखले देण्यात आले. यामध्ये भिंगार येथील प्रियदर्शनी शाळा कडून दाखले देण्यात आले.
परंतु सावेडी येथील आठरे पाटील पब्लिक स्कूल या शाळेने दाखले न देता शाळेच्या गेटवर गुंड असे भाडोत्री बाउन्सर उभे करण्यात आले व त्या गेटवरून पालकांना व विद्यार्थ्यांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विरोधात 25 तारखेला मनपा शिक्षण अधिकारी यांच्या दालनात अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, असेही यावेळी संतोष नवसुपे यांनी सांगितले.
