। अहमदनगर । दि.19 एप्रिल । हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून काही राजकीय पुढार्यांना निवडणुकीपूर्वी शहरात दंगल घडवायची आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करून वातावरण दूषित करण्याचे काम सुरू आहे. कोणीही लुंग्या सुंग्या यांनी उठायचे आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना त्रास द्यायचा तुम्हाला शिव्या देण्याचा अधिकार कोणी दिला? यापुढील काळात हे सहन केले जाणार नाही.
कर्मचार्यांमध्ये असभ्य वर्तन करणार्यांना धडा शिकवण्याची ताकद आहे. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू. आम्ही शाहू फुले आंबेडकर विचाराचे लोक आहोत या शहराची वैचारिक उंची खूप मोठी आहे. आम्ही सक्षम आहोत विघ्न संतोषी लोकांनी जातीवादाच्या माध्यमातून अधिकार्यांना व कर्मचार्यांना वेठीस धरण्याचे काम करू नये असा इशारा महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला आहे.
मनपा आयुक्त यांना आमदार नितेश राणे यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने निषेध सभा घेऊन काम बंद आंदोलन केले. यावेळी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, अनंत वायकर,नाना देशमुख, वसंत थोरात, नंदाताई भिंगारदिवे, के. के. जाधव, रंगनाथ गावडे, सुरेश इथापे, परिमल निकम, रोहिदास सातपुते, शेखर देशपांडे, किशोर कानडे,नागेश्वर पवळे, गुलाब गाडे आदी सह कर्मचारी उपस्थित होते.
