। अहिल्यानगर। दि.15 मे 2026 । बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खतांचा काळाबाजार, सक्तीची जोडविक्री व निर्धारित दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या पीक विमा कंपन्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,
आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ.जी.के.ससाणे, डॉ.प्रशांत बोडके, दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत ओगले, आमदार किरण लहामटे, उपविभागीय महसूल, कृषी अधिकारी, तहसीलदार , तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले , खरीप हंगामात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे. जिल्ह्यात खतांचा पुरेसा राखीव साठा उपलब्ध ठेवण्यात आला असून, पारंपरिक युरिया व डीएपीला प्रभावी पर्याय म्हणून ‘नॅनो युरिया’ व ‘नॅनो डीएपी’च्या वापरास प्रोत्साहन द्यावे. खत खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी खतांच्या पिशव्यांवरील ‘क्यूआर’ प्रणाली व इलेक्ट्रॉनिक विक्री यंत्रणा प्रभावीपणे राबवावी. सर्व कृषी सेवा केंद्रांवर खतांचे दर व उपलब्ध साठा दर्शविणारे फलक लावणे बंधनकारक करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
