। अहमदनगर । दि.04 एप्रिल । कै. रेवजी पवार यांनी शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. आयुष्यभर समाजातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बायजाबाई शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष व रेसिडेन्शिअल विद्यालयाचे माजी प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा सर्वदूर उमटवला. मलाही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. जीवनात त्यांचा आदर्श घेऊन मी वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन न्यू आर्टस् महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब पवार यांनी केले.
बायजाबाई शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष व रेसिडेन्शिअल विद्यालयाचे माजी प्राचार्य रेवजी पवार यांच्या 78व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री. पवार बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब नय्यर, रावसाहेब पवार, किसनराव लोटके, बाळासाहेब पवार, भास्कर गोरे, बापूराव आंधळे, दामोधर सातपुते, जनाबाई पवार, मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार, नगरसेविका संध्याताई पवार, सुरेश लोटके, अशोक बारस्कर, प्रकाश देशमुख, अविनाश देशमुख, भास्कर हांडे, विकास जगताप, गौरी कानवडे, तनिष्का पवार, मुख्याध्यापिका मंदा हांडे आदी उपस्थित होते. कै. रेवजी पवार यांच्या नातवंडांनी नय्यर विद्यालयास समई भेट दिली.
संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब नय्यर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे कै. रेवजी पवार यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करू. त्यांच्या विचारांनी आम्ही प्रेरित असून, त्यांच्या विचारांचे आजच्या तरुण पिढीने आचरण करावे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक बापूराव आंधळे यांनी केले. निवेदन स्वाती पवार यांनी केले, तर मुख्याध्यापिका मंदा हांडे यांनी आभार मानले.
