नगरच्या अन्न व औषध प्रशासनास उशीराने जाग!
कार्बाईडने पिकविलेले 622 किलो आंबे नष्ट!
गुजरातच्या आंब्यांची देवगड हापूसच्या नावाने फसवणूक
। अहमदनगर । दि.10 जुन । आंबा पिकवण्यासाठी चायना कार्बाईडचा सर्रास वापर करत आंबा व्यापारी ग्राहकांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुजरातमधून येणार्या आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री करत नागरिकांच्या खिशाला कात्रीही लावली जात आहे.
नगरच्या अन्न व औषध प्रशासनास उशीराने का होईना जाग आली आहे. आरोग्यास घातक असलेल्या कार्बाईड पावडरचा वापर करून पिकविलेले 622 किलो आंबे हे अन्न व औषध विभागाने जप्त करून नष्ट केले आहे. बाजार समितीतील दोघा आंबा विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे उर्वरित व्यापारीही धास्तावले आहे. कार्बाईडशिवाय आंबा पिकविणे म्हणजे कष्टप्रद. त्यामुळे आंबा विक्रेत्यांचा शॉर्टकट आंबा पिकविण्याच्या प्रकाराला काही अंशी लगाम बसला आहे.
आंबे पिकवण्यासाठी शासनाने इथिनिल 100 पीपीएम च्या वापराला मंजुरी दिली आहे. ज्या व्यापार्यांकडे चेंबर आहेत अशा व्यापार्यांना इथिनिल वापरण्याची परवानगी आहे. मात्र, फळ मार्केटमध्ये व्यापारी मात्र सर्रासपणे पैसे कमवण्याच्या मोहापायी कार्बाइडचा वापर करत आंबे पिकवत आहे. घातक रसायनामुळे दोन दिवसांत हिरवा आंबा पिवळा होतो. हा आंबा खाण्यास धोकादायक आहे.
नागरिकांचा जीव धोक्यात आंबा व्यापार्यांच्या स्पर्धेत हे व्यावसायिक मात्रापेक्षा अधिक इथिनिल आणि चायना कार्बाइडचा वापर करत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. देवगड हापूसच्या नावाने गुजरातचा आंबा विक्री करत ग्राहकांची आर्थिक फसवणूक करत आहे.
नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने मे. जय माता दी फ्रूट कंपनी व मे. अब्दुल कादीर सिकंदर बागवान शॉप क्रमांक 34, 35 व 36 येथे साठवून ठेवलेल्या आंब्यांमध्ये कार्बाईडची पावडर आढळून आली आहे. हा आंबा गुजरात येथील सलमान उर्फ अजमललाल महम्मद बागवान याने विक्रीसाठी आणला होता.
अधिकार्यांनी या आंब्यांचे नमुने घेत उर्वरित आंबे महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोत जाऊन नष्ट केले. सदर आंब्याचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाला आल्यानंतर आंबा विक्रेता व खरेदी करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे अन्न, औषध प्रशासनाचे आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.
----------------
सोयाबीन बियाणे पेरणीबाबत कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ; देशमुख-मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून मिळाली काव्या आणि दिव्याला ऐकण्याची आणि बोलण्याची संधी
Tags:
Breaking