महानगर रक्तदान शिबिरात 143 नगरकरांचे रक्तदान

। अहमदनगर । दि.01 जून 2022 । नगर शहरातचा 28 मे स्थापना दिन व स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व नगरकरांच्यावतीने  कै.बाळासाहेब देशपांडे उद्यानात महानगर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसाच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत 143 नगरकरांनी रक्तदान करुन सामाजिक संदेश दिला व अहमदनगर शहरावर असलेले प्रेम रक्तदानाच्या माध्यमातून व्यक्त केले.

उन्हाळ्यात जास्त रक्तदान शिबिरे होत नाहीत तसेच रक्तदाते रक्तदान कमी करतात त्यामुळे रक्तपेढीकडे रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. मात्र, यामुळे एखाद्या नगरकर रुग्णाला गरजेच्यावेळी रक्त उपलब्ध होत नाही. याचा विचार करून नगरच्या अनेक संघटना एकत्र येत नगरकरांच्यावतीने नगरकरांसाठी 28 मे 22 रोजी नगरच्या 532 व्या नगर स्थापना दिनाचे औचित्य साधून ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नगर शहरासह जिल्ह्यातील 143 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबीर यशस्वीतेसाठी टूगॅदर विकॅन ग्रुप, श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ, श्रीपरशुराम प्रतिष्ठान, निरंजन सेवाभावी संस्था, तिरंगा फाउंडेशन, श्री साई द्वारका सेवा (ट्रस्ट), महापद्मसेना ड्ढ नगर शहर, साई सेवा प्रतिष्ठान, आम्ही नगरकर वाद्य पथक, फाटके पाटील हॉस्पिटल, स्थायिन एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढीच्या कार्मचार्‍यांनी दोन दिवस विशेष परिश्रम घेत सर्व नियंमाचे पालन करुन रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.  यावेळी सर्व संघटनांच्यावतीने या शिबिरासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक रक्तदात्याचे व शिबिरासाठी सहकार्य करणार्‍या नगरकरांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post