नगर (दि.03) : शासकीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्यातील हमाल माथाडी कामगारांना प्रधानमंत्री यांचे गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत कोरोना साथी मध्ये काम करणाऱ्या देशभरातील शासकीय कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण योजना लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदरचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना लागू व बंधनकारक झाले असून अहमदनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, महानगरपालिकांनी तर अधिकृतने सदरची विमा सुरक्षा कवच योजना तेथील कर्मचाऱ्यांकरिता लागू केली आहे. ही योजना हमाल माथाडी कामगारांनाही लागू करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले यांनी केली आहे.
सदर योजना ही कोरोना साथीचा प्रतिबंध व उपचार इतक्या पूर्तीच मर्यादित नसून कोरोना साथीच्या काळात प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्षरीत्या अत्यावश्यक सेवामध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही लागू आहे. सद्यस्थितीत सदर योजना ही केवळ शासकीय अथवा शासकीय कर्मर्चायांकरिता लागू असली तरी तेथील अत्यावश्यक सेवेतील कंत्राटी अथवा मानधन तत्वावर नेमणूक करण्यात आलेल्या कर्मर्चायांनाही सदर योजनेचे लाभ लागू झाले आहेत.
मात्र राज्यभर हमाल माथाडी कामगार या जीवनावश्यक सेवांमध्ये काम करीत आहेत. या कामगारांचे अरोग्यास व जीवितास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाल्याने कामगारांना विमा सुरक्षा कवच योजना राज्य सरकारने लागू करावी अशी मागणी राज्य हमाल मापाडी महामंडळ पुणे-सह चिटणीस व अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले यांनी लेखी पत्राद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.
