। हिंगोली । दि.27 एप्रिल । औंढा नागनाथ तालुक्यातील पांगरा हाके येथे एका तरुण शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (२६ एप्रिल) सकाळी ही घटना घडली. अनिल माधवराव देवकर (३६) असे मृत शेतकऱ्यांचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगरा हाके येथे अनिल देवकर यांना सुमारे चार एकर शेतजमीन आहे. घरी पत्नी, तीन मुली व एक मुलगा असून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतजमिनीवर चालत होता. मात्र मागील काही वर्षांत सततच्या नापिकीमुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.
मागील वर्षीही अतिवृष्टीमुळे हातचे पीक वाया गेले. त्यामुळे अनिल देवकर आणखी अडचणीत सापडले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. शेती व उदरनिर्वाह याची चिंता त्यांना भेडसावू लागली होती. आज सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घरी जेवण करून शेतात जातो असे म्हणून घराबाहेर पडले.
त्यानंतर त्यांनी शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पवन चाटसे, वराडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. देवकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
