। मुंबई । दि.18 एप्रिल । प्रतिनिधी । सिल्वर ओक हल्ला प्रकरणातील आरोपी अॅड.जयश्री पाटील यांनी अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी आता मुंबई सत्र न्यायालयात अप्पर सत्र न्यायाधीश आर.एम.सादराणी यांच्या समोर याचिका दाखल केली आहे.
तसेच या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या याचिकेवर आता काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
अॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने दिलेले पोलीस संरक्षण गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील- सदावर्ते यांनी सोडले. मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचार्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना 8 एप्रिल रोजी अटक केली.
सध्या गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या कोठडी आहेत.एसटी कर्मचार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हल्ला प्रकरणात जयश्री पाटील यादेखील आरोपी असून, सध्या त्या पसार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
सदावर्ते यांना 8 एप्रिलला अटक केल्यानंतर 9 एप्रिल रोजी जयश्री पाटील यांनी राज्य सरकारने दिलेले संरक्षण सोडले आहे. जयश्री पाटील त्यांच्याविरोधात गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पसार दाखवण्यात आले आहे.
Tags:
Crime
