जिल्हाधिकारी कार्यालयासाठी शहर बससेवा सुरू करा
महापौरांचे मनपा प्रशासनाला आदेश
। अहमदनगर । दि.22 एप्रिल । नगरचे नवे जिल्हाधिकारी कार्यालय आता औरंगाबाद महामार्गावरील शासकीय विश्रामगृहामागे उभारण्यात आले असल्याने या कार्यालयासह मनपा व अन्य कार्यालयात जाऊ इच्छिणारांसाठी मनपाच्या शहर बसवाहतूक सेवेद्वारे या मार्गावर स्वतंत्र बससेवा सुरू केली जावी, असे आदेश महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.
जुन्या बस स्थानकावरून औरंगाबाद रोड मार्गे गुलमोहर रोडपर्यंत तात्काळ शहर बस सेवा सुरु करण्यात यावी असे महापौर शेंडगे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे शासकीय विश्रामगृहाच्यामागे स्थलांतर झाले आहे. जिल्हाभरातून नागरिक कामासाठी येथे येतात.
तसेच मनपाचे मुख्यालय, जलसंपदा, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय व अन्य महत्त्वाची शासकीय कार्यालय याच औरंगाबाद मार्गावर आहेत. या रस्त्यावर बहुतांश शासकीय कार्यालये आल्यामुळे नागरिकांना याठिकाणी येण्यासाठी अडचणी येत आहेत.
त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहर बससेवा जुने बस स्थानक ते जीपीओ चौक ते डीएसपी चौक ते शासकीय विश्राम गृह ते गुलमोहर रोड यामार्गे सुरु करावी. संबंधितांना याबाबत तत्काळ सूचना द्याव्यात, असे आदेश महापौर शेंडगे यांनी दिले आहेत.
Tags:
Ahmednagar
.jpg)