। अहमदनगर । दि.21 एप्रिल । प्रतिनिधी । बंधन बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून नेल्याची घटना बुधवारी सकाळी कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे घडली.
संबंधित महिलेने घराबाहेर येऊन आरडाओरड केल्यावर परिसरातील नागरिकांनी त्या चोरट्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमनाथ रंगनाथ अडागळे (वय 32, रा. संभाजी नगर नेवासे फाटा, हल्ली रा. भंडारी चौक, भूषननगर, केडगाव) असे आरोपीचे नाव आहे. सुरेखा सुरेश पेगडवार (वय 54, रा. रविश कॉलनी, कायनेटीक चौक) यांनी याबाबत फिर्याद दिली.
18 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजणच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती पेगडवार यांच्या घरी गेला व बंधन बँकेचा अधिकारी असल्याचे आणि त्याला रूम भाड्याने हवी आहे अशी त्याने विचारणा केली होती.
त्यानंतर बुधवारी सकाळी पेगडवार यांची मुलगी नेहमीप्रमाणे दुकानावर गेलेली असताना व पेगडवार घरामध्ये असताना आरोपी घराचा दरवाजा ढकलून आत गेला व त्याने पेगडवार यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढन चोरून नेली.
पेगडवार यांनी आरडाओरड केल्यावर लोकांच्या मदतीने चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. आरोपीला कोतवाली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पेगडवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
Tags:
Ahmednagar
