। अहमदनगर । दि.25 एप्रिल । कोपरगाव मुर्शतपूर येथे विहीरीचे खोदकाम करताना राजस्थान भिलवाडा येथील मजूर क्रेनची वायर व शॉफ्ट तुटून विहीरीतील खडकावर आपटून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली.
ही घटना शनिवारी मध्यरात्री ११.३० वाजता घडली. जेठालाल जग्गू बिल व त्याची पत्नी शांती हे विहिरीच्या खोदकामावर मजूर म्हणून काम करत असताना ते क्रेनच्या टोपल्यात बसले व क्रेनने विहीरीचे मटेरियल काढण्यासाठी विहिरीत जात असताना क्रेनची वायर व शाॅफ्ट तुटला.
टोपल्यात बसलेले पती-पत्नी मजूर विहिरीतील खडकावर जोरात आदळले. त्यात ते दोघे जबर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश कारभारी रहाणे, येसगाव यांनी दिलेल्या खबरीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पुढील तपास करीत आहेत.
