भांडवलदारांच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहान होलसेलर व रिटेलर केमिस्टनी एकत्र यावे : जगन्नाथ शिंदे

भांडवलदारांच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहान होलसेलर व रिटेलर केमिस्टनी एकत्र यावे : जगन्नाथ शिंदे

केमिस्ट मेळाव्यात भविष्यातील आव्हानांवर विचारमंथन


। अहमदनगर । दि.17 एप्रिल । प्रतिनिधी । भारतातील सर्वात मोठा औषध विक्रीचा व्यवसाय काबीज करण्यासाठी मोठ्या भांडवलदारांच्या कॉर्पोरेट कंपन्या मोठ्या ताकतीने उतरले आहे. यामुळे मागील चाळीस वर्षापासून सेवा देणारे लहान फार्मासिस्ट संपणार आहे.

भांडवलदारांच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहान होलसेलर व रिटेलर फार्मासिस्ट एकत्र येण्याची गरज आहे. स्पर्धेचा सामना स्पर्धेने करावा लागणार आहे. यासाठी लहान-लहान रिटेलर व होलसेलरनी एकत्र येऊन मोठी शॉपी बनवून स्पर्धेत टिकण्याचे आवाहन अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांनी केले.

टिळक रोड येथील हॉटेल राज पॅलेस मध्ये आयोजित केमिस्ट मेळाव्यात औषधी व्यवसाय व त्यासमोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष चेतन कर्डिले, जिल्हा सचिव राजेंद्र बलदोटा, शशिकांत रासकर, शहराध्यक्ष दत्ता गाडळकर, जिल्हा संचालक संजय गुगळे, शहर सचिव विलास शिंदे, महेश रच्चा, संजय वाव्हळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, गॅट करारामुळे रिटेलर व्यावसायिकांवर गदा आली. मात्र 187 देशांचा समावेश असलेला हा करार रद्द होणे अशक्य आहे. मोठ्या भांडवलदारांशी स्पर्धा करताना छोट्या व्यावसायिकांना तग धरणे अवघड असून, त्यांनी संघटितपणे एकत्र येऊन व्यावसाय केला पाहिजे. स्पर्धामय युगात सेवा देताना फार्मासिस्ट बांधवांना मार्केटिंग शिकणे आवश्यक आहे. बजेट तुमचे औषध आमचे, हे ब्रीद घेऊन केमिस्ट बांधवांना पुढे जावे लागणार आहे.

टाटा, बिर्ला सारखे मोठे भांडवलदार या क्षेत्रात उतरल्याने संघटनशिवाय पर्याय नाही. अनेक होलसेलर एकत्र करून एक मोठे औषधांचे गोडाऊन उभारुन एका छताखाली सेवा देण्याचा प्रयोग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यशस्वी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. काळाप्रमाणे बदल स्वीकारावा लागणार असून, एकटा व्यावसायिक या स्पर्धेत टिकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्यासाठी नितीन गांधी, सुधीर लांडगे, संकेत गुंदेचा, हेमंत गुगळे, रुपेश भंडारी, आशुतोष कुकडे, अनिल गांधी, राजेंद्र गुजराथी, अविनाश साळुंखे, मनोज खेडकर, शरद डोंगरे, भरत सुपेकर, देविदास काळे, युवराज खेडकर, प्रशांत दारकुंडे, सुरेश तोडमल, शैलेश औटी, महेश अभंग, राजेंद्र बध्ये, आबा बेंद्रे, अरुण सावंत, सुहास जरांगे आदींसह जिल्ह्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गांधी व अमित धाडगे यांनी केले. आभार महेश रच्चा यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post