। अहमदनगर । दि.26 एप्रिल । बी बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये ही खबरदारी घेऊन कृषी विभागाने कृषी केंद्र चालकांना सूचना कराव्यात. तसेच खते,बी,बियाणे व औषधांचा तुटवडा निर्माण करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करावी, असे आदेश राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
राहुरी कृषी विभागाने आयोजित केलेल्या खरीप हंगामपुर्व नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्री तनपुरे म्हणाले, राहुरी मतदार संघात खते, बी बियाणे, औषधांचा तुटवडा होणार नाही. याकडे कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कृषी केंद्र चालकांना नियम घालून दिले आहेत.
या नियमाचे उल्लंघन करणा-या चालकांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यमंत्री तनपुरे यांनी दिले आहेत. या बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी नलगे, राहुरीचे कृषी अधिकारी ठोकळ सह राहुरी,नगर,पाथर्डी तालुक्यातील कृषी, महसूल, सहाय्यक निबंधक उपस्थित होते.
