। मुंबई । दि.21 मार्च । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवार 21 मार्च 2022 रोजी तिथीनुसार जयंती. संपूर्ण महाराष्ट्रसाठी आजचा दिवस उत्साहाचा आहे. या दिवसाच्या निमित्ताने एका अभिनेत्याने तो साकारत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा फोटो शेअर केला आहे.
हा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. गश्मीर लवकरच सरसेनापती हंबीरराव या बायोपिकमध्ये तो छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत झळकणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने त्याने त्याचा शिवाजी महाराजांच्या रुपातला फोटो शेअर केला आहे.
घोड्यावर बसून दौडत जाणाऱ्या महाराजांच्या रुपातल्या गश्मीरच्या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती लाभली आहे. गेल्या काही काळापूर्वी तो महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती त्याने दिली होती. त्यानंतर त्याच्या लूकची प्रतीक्षा तमाम प्रेक्षक वर्गाला होती. ती उत्सुकता आता शमली आहे.
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर बेतलेल्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात अभिनेता प्रवीण तरडे हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 27 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.