। मुंबई । दि.01 फेब्रुवारी । शेतकऱ्यांना चालू व खरीप हंगामात अडचण येणार नाही यासाठी खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा असे नियोजन करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
चालू व खरीप 2022 मध्ये खतांचा सुरळीत पुरवठा होण्याच्या अनुषंगाने कृषीमंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी संचालक डी.एम. झेंडे, कृषी सहसचिव गणेश पाटील, मापदा चे अध्यक्ष विनोद तराळ, सचिव बिपिन कासलीवाल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळांतर्गत खतांचे उत्पादन वाढविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा. एमएआयडीसीला 30 टक्के प्रमाणे खते उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून प्रयत्न करण्यात यावेत, असेही .भुसे यांनी सांगितले.
कंपन्यांनी कुठल्याही खताचा साठा न करता वेळेवर खताचा पुरवठा सुरळीत होईल याकडे लक्ष द्यावे, येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना खते वेळेवर उपलब्ध करून द्यावी. ज्या कंपन्या शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरतील त्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही श्री.भुसे यांनी सांगितले.
यावेळी खरिप हंगामात खतांची उपलब्धता, सद्य:स्थिती व संभाव्य अडचणी, खरीप हंगाम सुरुवातीचा शिल्लक साठा, वर्षनिहाय खत शिल्लक साठा, रब्बी हंगाम 2021-22 खत पुरवठा नियोजन, खरीप 2022 चे नियोजन, कंपन्यांकडून महिनानिहाय करण्यात येणारे नियोजन,
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्याकडील मिश्रखत कारखान्याकडे मिश्रखत उत्पन्नाकरिता प्राप्त मागणी, केंद्रीय खत विभागाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदान वितरण प्रणालीबाबतचा प्रस्ताव, सध्याच्या डीबीटी पद्धतीतील अडचणी याबाबत आढावा घेण्यात आला.